दुर्गंधी, दारूच्या बाटल्या व काचेच्या तुकड्यांमुळे नागरिक त्रस्त; तात्काळ उपाययोजनांचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन.
कुडाळ : शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर नगरसेवक गावडे यांनी मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.
कुडाळ शहरातील एम.आय.डी.सी. रोड, नाबरवाडी, कुडाळ रेल्वे स्टेशन रोड तसेच कुडाळ नाडकर्णी पेट्रोल पंपाच्या शेजारील पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. या कचऱ्यामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या, फुटलेल्या काचा तसेच इतर घातक वस्तू पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन नगरसेवक अभिषेक गावडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी घेऊन जात कचऱ्याची समस्या दाखवून दिली. पाहणीदरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित भागांची सविस्तर माहिती घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेत कचरा हटविणे, परिसर स्वच्छ करणे आणि आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन नगरसेवक अभिषेक गावडे यांना दिले.
शहरातील स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही समस्या तातडीने सोडविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले असून लवकरच संबंधित ठिकाणांवरील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Subscribe










