शाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री घडला अपघात
कणकवली : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा पुळवत असलेल्या संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत वगळता मोठी इजा नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
मध्यरात्री गाढ झोपेत दोन वाजता अपघाताचा मोठा आवाज आला.अपघाताची भीषणता मोठी होती,मात्र या अपघातात एसटी बसचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अपघाताचा आवाज महामार्गालगत बाजूला असलेल्या नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांना आला.त्यांनी याबाबत तातडीने मदत मिळण्यासाठी बाजूलाच असलेले सामाजिक कार्यकर्ते भूपेश मोरजकर यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मग लगेचच पोलीस पाटील वृषाली मोरजकर, भुपेश मोरजकर, केदार खोत , प्रभाकर म्हसकर, दीक्षा मोरजकर यांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली.घाबरलेल्या मुलांना धीर दिला. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. किरकोळ जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
तसेच अपघाताची खबर नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली.अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे, चंद्रकांत माने , तसेच महिला पोलिस प्रणाली जाधव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.