चारचाकी वाहनाच्या धडकेत महिला गंभीर

वैभववाडी तालुक्यातील घटना

वैभववाडी : तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवर नाधवडे सावंतवाडी येथे भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात राधाबाई बाळकृष्ण पेडणेकर वय वर्ष 65 रा. नाधवडे सावंतवाडी या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमीवर कणकवली उप रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात जखमी झालेल्या राधाबाई पेडणेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी सायंकाळी त्या घराशेजारी वाढलेले गवत काढून साफसफाई करत होत्या. काढलेले गवत व कचरा टाकण्यासाठी त्या रस्ता ओलांडत होत्या. याच दरम्यान वैभववाडीहुन तरेळेच्या दिशेने पांढऱ्या रंगाची चार चाकी वाहन भरधाव वेगाने आले. या वाहनाची त्यांना जोरदार धडक बसली. यात त्यांच्या गुडघ्याला व खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात होऊनही तो वाहनचालक न थांबता तरेळेच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर अपघातग्रस्त महिलेचा मुलगा व वाडीतील लोक आले. त्यांनी त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

error: Content is protected !!