झाराप झिरो पॉईंट बॉक्सवेलचे काम संथगतीने

अपघात, धूळ, चिखल यामुळे वाहनचालकांसह शेतकऱ्यांनाही त्रास

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट येथील बॉक्सवेलचे काम रखडलेल्या स्थितीत आहे. गेले दोन वर्षे या बॉक्सवेलचे काम सुरू असून काम कूर्मगतीने सुरू आहे. या स्थितीमुळे स्थानिक शेतकरी, व्यावसायिक व प्रवाशी, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे रखडलेले काम कधी गती घेणार? असा प्रश्न असून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे नवीन मंजूर झालेल्या बॉक्सवेलचे काम गेले दोन वर्षे सुरु आहे. या ठिकाणी काळे खडक असल्याने सुरुवातीपासूनच काम संथगतीने सुरू झाले. हे काळेथर खडक फोडण्यासाठीच एक वर्ष लागले. गेले हे खडक फोडण्याचे काम पूर्ण झाले. माहित्या मुख्य बॉक्सवेलचा ढाचा बांधणीचे काम हाती घेण्यात आले. हे कामही पूर्ण झाले आहे. आता दोन्ही बाजूला भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम गेले बरेच दिवस रेंगाळलेल्या स्थितीत आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी केवळ दोनचार कामगार काम करताना दिसतात. या कूर्मगती कामाचा फटका वाहन चालकांबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांनाही बसत आहे. यापूर्वी महामार्ग चौपदरीकरणाचे करण्यात आले तेव्हा स्थानिक शेतकरी, रहिवाश्यांना धुळ, चिखल यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांना तर मोठा त्रास सहन करावा लागत होता. भरावाची माती मोठ्या प्रमाणावर शेतात घुसल्याने शेती करणे अवघड झाले होते.

मात्र, आता परत तीच स्थिती स्थानिकांच्या मालाला आली आहे. या बॉक्सवेल कामाला कोणाचाही विरोध नाही. मात्र संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे स्थानिक नागरिक व वाहनधारक त्रस्त आहेत. जे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक होते ते काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. याच गतीने काम सुरू राहिल्यास हे काम पूर्ण होण्यासाठी अजून किती दिवस लागतील हे सांगता येणार नाही. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाही सर्व्हिस रोडवर येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तेवढा भाग वगळून काम सुरू आहे. या ठिकाणी अद्यापही काही खडक फोडावे लागणार आहेत. आधीच या ठिकाणी कोणताही अभ्यास न करता दोन मिडलकट ठेवण्यात आला. यानंतर उशिराने बॉक्सवेलला मंजुरी देण्यात आली. येथील कामाचा दोनवेळा आराखडा तयार करून तसे काम करण्यात शासनाचा बराचसा बाया गेला. त्यामुळे आता तरी हे काम जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी स्थानिकांची आहे.

error: Content is protected !!