सिंधुदुर्गनगरी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी (Farmer ID) अनिवार्य करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी तयार केलेला नाही, त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ मिळणार नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करून फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने प्रसिध्दीपत्राव्दारे केले आहे.
अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यात येत असून विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. फार्मर आयडी तयार झाल्यास लाभार्थ्यांना वारंवार ई-केवायसी करण्याची गरज भासणार नाही. तसेच पीक विमा, पीक कर्ज, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) तसेच विविध कृषी अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे.
अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी डिसेंबर २०२४ पासून नागरी सुविधा केंद्रे आणि विशेष शिबिरांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ३ लाख ३७ हजार ३८१ कृषी खातेदार असून प्रधानमंत्री किसान योजनेचे १ लाख २० हजार ६४६ लाभार्थी सक्रिय आहेत. त्यापैकी आजअखेर ९४ हजार ६४५ लाभार्थ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी तयार करून घ्यावा, अन्यथा त्यांना पीएम-किसान योजनेसह विविध कृषी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. सध्या स्वयं-नोंदणी (Self Registration) सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकऱ्यांनी त्याचाही उपयोग करून आपला फार्मर आयडी तयार करावा असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Subscribe








