काही दिवसांपूर्वी परिसरात आढळला होता अज्ञात महिलेचा मृतदेह
पोलिसांकडून शोध सुरू
दोडामार्ग : तिलारी घाटात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच घाट परिसरात एक बेवारस आणि संशयास्पद दुचाकी आढळल्याची माहिती पुढे आल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. मृत महिलेची ओळख अद्याप समोर आलेली नसल्याने आणि दुचाकीचा मालकही निश्चित झालेला नसल्याने विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
तिलारी जलविद्युत प्रकल्पाच्या जलवाहिनीच्या प्रेशर पॉईंटकडे जाणाऱ्या दुर्गम मार्गालगत झाडीत संबंधित महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेह बऱ्याच दिवसांपासून पडून असल्याने तो मोठ्या प्रमाणात कुजला होता. त्यामुळे ओळख पटविण्याचे काम पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरत आहे. या मृत्यूमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. दरम्यान, घाटातील एका ठिकाणी संशयास्पद स्कूटर दिसून आली. ही दुचाकी नेमकी कोणाची? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. तसेच ती तेथे कधीपासून आहे? कोण आणून ठेवून गेले? याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांकडून दुचाकीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे मालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. या तपासातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिलारी घाट हा दाट जंगल, खोल दऱ्या आणि कमी वर्दळ यामुळे ओळखला जातो. यापूर्वीही या परिसरात संशयास्पद मृत्यूंच्या घटना समोर आल्याने सद्य प्रकरण गांभीर्याने घेतले जात आहे. मृत महिलेच्या अंगावर मोरपिसी रंगाची साडी, लाल व सोनेरी रंगाचा ब्लाऊज तसेच पायात पैजण आणि जोडे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तपशीलांच्या आधारे तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी घाटात आढळलेल्या दुचाकीमुळे तपासाला काही नवीन दिशा मिळते का? याकडेही लक्ष लागले आहे. पोलिस तपासातून नेमके सत्य समोर येण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.
दुचाकी ठरणार का महत्त्वाचा धागा?
अज्ञात महिलेच्या मृत्यूचा तपास सुरू असताना घाटात सापडलेली बेवारस दुचाकी तपासासाठी उपयुक्त ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. वाहनाच्या मालकाचा शोध लागल्यानंतर त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का? हे स्पष्ट होऊ शकते. मात्र सध्या तपास प्राथमिक टप्प्यात असून अधिकृत निष्कर्ष येईपर्यंत कोणताही अंदाज बांधणे योग्य ठरणार नसल्याचे पोलिसांच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.


Subscribe










