जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. चे महत्वाचे पाऊल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे घेतला भव्य रक्तदान शिबिर

जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. तर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रक्तकेंद्र व रक्तविघटन केंद्र, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्मार्ट सर्व्हिसेसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध केली. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी रक्ताची गरज सतत भासत असते. अशा वेळी रक्तदात्यांनी दिलेला प्रत्येक रक्ताचा थेंब एखाद्याला नवजीवन देणारा ठरतो.

या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी केवळ रक्तदानच केले नाही, तर समाजात रक्तदानाविषयी जनजागृती करण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य केले. रक्तदान हे सुरक्षित, सोपे आणि सर्वश्रेष्ठ दान असून त्याद्वारे अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते, हा संदेश या शिबिरातून देण्यात आला.

या रक्तदान शिबिरास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ शिल्पा नारायणकर,यांच्यासह स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि.चे सर्व कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाच्या यशस्वीतेस हातभार लावला.

समाजहितासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा निश्चितच प्रेरणादायी असून भविष्यातही अशा सामाजिक कार्यांमध्ये स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. सक्रिय सहभाग नोंदवत राहील.

error: Content is protected !!