गवारेड्यांचा वनविभागाने बंदोबस्त करा – वाहनांचालकांची मागणी
कणकवली : कणकवली तालुक्यातील कळसुली – जाभळ स्टॉप ते गवसवाडा मार्गावर सोमवारी (दि. १ जून) रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास गव्याने रिक्षेला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात रिक्षेचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचालक रविकांत सहदेव नाईक हे किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कळसुली येथील रहिवासी व रिक्षाचालक रविकांत नाईक हे कणकवली येथून आपल्या घरी कळसुलीकडे रिक्षाने जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याने रिक्षेच्या दर्शनी भागाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षेचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने रविकांत नाईक यांना किरकोळ दुखापत झाली असून मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान, कळसुली मुख्य मार्गावर गवे दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी वारंवार दिसून येत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गवाऱ्यांचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने तातडीने योग्य ती उपाययोजना करून या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालक तसेच कळसुली ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.


Subscribe










