कारवाई न झाल्यास कुडाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांचा इशारा
सिंधुदुर्ग क्रीडा विभागाच्या ताब्यात असलेल्या कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या बाजूच्या शासकीय मैदानावर वेगळेच ‘क्रीडा प्रकार’ सध्या सुरु आहेत. हे शासकीय मैदान सध्या दारूड्यांचा अड्डा बनलं असल्याचं चित्र या मैदानाकडे पाहिल्यावर दिसत. वारंवार याबाबत कुडाळ पोलिसांना आणि संबंधित यंत्रणांना सांगून सुद्धा प्रशासन कोणतीच दखल घेत नाही असा आरोप खेळाडू आणि लोकप्रतिनिधींनी केला आहे. या बाबत योग्य ती कारवाई झाली नाही तर लवकरच कुडाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन छेडू, तसेच प्रशासनाला जमत नसेल तर प्रसंगी या मैदानाची सफाई सुद्धा करू असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख तथा कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिला आहे.
कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला शासकीय मैदान आहे. या मैदानावर अनेक खेळाडू सराव करत असतात. क्रिकेटच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा या ठिकाणी होतात. हे मैदान क्रीडा विभागाच्या ताब्यात आहेत. या मैदानाभोवती तहसील, प्रांत, वन विभाग, लाच लुचपत प्रतिबंध विभाग अशी महत्वाची कार्यालये आहेत.
पण अलीकडे पाहिलं तर रात्रीच्या काळोखाचा फायदा घेऊन काही मद्यपींनी या मैदानाचा उपयोग दारू प्यायचा अड्डा म्हणून सुरु केला आहे. त्या मैदानावर ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या दिसून येतात. काही ठिकाणी या बाटल्या फोडून टाकलेल्या आहेत. खेळताना या बाटल्याच्या काचा लागून खेळाडू जखमी होऊ शकतात. पण याचे कोणतेही भान या दारुड्याना नाही.
काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने कुडाळ शहरातील अवैध धंदे बंद करा असे निवेदन पोलिसाना देण्यात आले होते. पण त्याचा अजूनही काही परिणाम दिसत नसल्याचे नगरसेवक मंदार शिरसाट, आणि तालुका प्रमुख राजन नाईक यांनी सांगितले. जिल्हा ए आय झाला पण सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. म्हणूनच शहरात लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करण्यात आली होती. पण पोलीस प्रशासनाने या मागणीला केराची टोपली दाखवली. येथे अशा मैदानात काळोखाचा फायदा घेऊन मद्य प्राशन केले जाते. बाटल्या तिथेच फोडल्या जातात.
त्यामुळे येत्या काही दिवसात कुडाळ शहरात सीसीटीव्ही लागले नाहीत तर कुडाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा मंदार शिरसाट यांनी दिलाय.
ठाकरे सेनेचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी देखील हा प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून याठिकाणी मैदान उपलब्ध झाले. पण त्याचा वापर अनैतिक गोष्टींसाठी होत आहे. हे मैदान दारू पिण्याचे ठिकाण बनले आहे. येथे लाईटची व्यवस्था नाही. सीसीटीव्ही नाही. पोलिसांनी येथे रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी श्री. नाईक यांनी पोलिसांबरोबरच आमदार निलेश राणे यांच्याकडे देखील केली.
या मैदानावर अनेक मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात. राज्य आणि राज्याबाहेरून खेळाडू होतात. नाईट क्रिकेट स्पर्धा सुद्धा होतात. हे मैदान सुस्थितीत आणण्यासाठी शासन नाही तर काही खेळाडूच आणि क्रीडा स्पर्धा आयोजकच स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात. हे मैदान साफ करताना फार मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या, म्हणजे रात्रीच्या वेळी हे मैदान कसा दारूचा अड्डा बनते हे दिसून येते असे खेळाडू आणि क्रीडा स्पर्धा आयोजक संतोष शिरसाट यांनी सांगितले.
काही डंपर चालक येथे डंपर लावून दारू पितात असा आरोप देखील संतोष शिरसाट यांनी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.
अनेक खेळाडू, लहान मुले या ठिकाणी खेळण्यासाठी येतात. खेळण्यापूर्वी त्यांना मैदानातून दारूच्या बाटल्या उचलून बाजूला ठेवाव्या लागतात. फुटलेल्या बाटल्यांच्या काचा बाजूला टाकून द्याव्या लागतात. बऱ्याच वेळा हे खेळाडू या बाटल्या शिस्तीत बाउंड्री लाईन वर लावून ठेवतात. त्या बाटल्या बाजूला करण्यातच या खेळाडूंचा वेळ फुकट जातो.
काळोखाचा फायदा घेऊन या शासकीय मैदानावर दारूच्या पार्ट्या होता असतील तर ते समाजहिताच्या दृष्टीने बरोबर नाही. इतर अनेक अनैतिक धंदे वाढले आणि त्यातून कोणाचा जीव गेला तर शासनाला जागा येणार आहे का, असा सवाल मात्र कुडाळवासीयातून उपस्थित होतोय. ते होउ नये म्हणून प्रशासनाने या दारू पिणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी क्रीडाप्रेमींनी केली आहे.


Subscribe










