सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर; सिंधुदुर्गासाठी विशेष मनुष्यबळ व साहित्य रवाना

मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार घेतली तातडीने बैठक

सांगली, सातारा, बारामती या ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना

मोडलेले पोल तातडीने उभे करून वीज पुरवठा केला जाणार सुरळीत

पालकमंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेत दिल्या सूचना

राज्याच्या मेजर स्टोअर मधून आवश्यक ते साहित्य पुरविण्याच्याही दिल्या सूचना

मुख्यमंत्री कार्यालयाकडून तातडीच्या उपायोजनांमुळे सिंधुदुर्ग वासियांना दिलासा

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस व वादळी वाऱ्यात पडझड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारणांचा आढावा घेतला. मोडलेले पोल पुन्हा उभे करण्यासाठी सातारा, बारामती, सांगली अशा ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात पाठविली जाणार आहेत. युद्ध पातळीवर पोल उभे करून ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे त्या गावांना वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. तर राज्याच्या मेजर स्टोअर मधून सिंधुदुर्गाला लागणारे ट्रांसफार्मर व इतर साहित्य पाठवून देण्याच्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे,वीज वितरण विभागाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये विजेचा पुरवठा खंडित झाल्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम केलेले आहे. यंत्रणा सज्ज करून वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाने आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली, या बैठकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे,मुख्य अभियंता, कोकण मंडळ अनिल डोये,सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 600 वीज खांब व ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले असून, विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. दोडामार्ग तालुक्यातील 62 गावे बाधित झाली असून काही भाग गेल्या 8 दिवसांपासून अंधारात आहेत. याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

यंत्रणेला आवश्यक असलेले सर्व साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, मनुष्यबळ वाढवावे आणि युद्धपातळीवर नियोजन करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले. भविष्यात अशा परिस्थितीत नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी प्रभावी नियोजन करावे. वारंवार ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणांची विशेष पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच धोकादायक ठिकाणांची ओळख पटवून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा हा दुर्गम जिल्हा असून येथे दरवर्षी अतिवृष्टीचा मोठा परिणाम होते. त्यामुळे केवळ पावसाळा सुरू झाल्यानंतर नव्हे, तर जानेवारी महिन्यापासूनच आवश्यक नियोजन आणि पूर्वतयारी सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
अल निनोच्या प्रभावामुळे हवामानातील बदल लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणेची टीम पूर्णपणे सज्ज ठेवावी. आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि उपकरणांची उपलब्धता वेळेत सुनिश्चित करून कोणत्याही संकटाला तत्काळ प्रतिसाद देता येईल, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचनाही या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे आणि अप्पर मुख्य सचिव चंद्रा यांनी दिल्या. .

error: Content is protected !!