दांडी किनाऱ्यावर पर्यटक व नागरिकांमध्ये जोरदार राडा

पर्यटकांकडून स्थानिक युवतीला बेदम मारहाण

मालवण : शहरातील प्रसिद्ध दांडी किनाऱ्यावर आज सायंकाळी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार राडा झाला. अरुंद रस्त्यावर गाडी पार्किंग करण्याच्या क्षुल्लक कारणावरून रायगड येथील पर्यटकांनी एका स्थानिक युवतीला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे दांडी किनाऱ्यावर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी पर्यटकांच्या गाडीची तोडफोड केली. अखेर पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला शांत केले आणि कडक पोलीस बंदोबस्तात पर्यटकांना पोलीस ठाण्यात आणले.

रायगड येथून आलेले काही पर्यटक मिनी ट्रॅव्हलर गाडीने मासळी खरेदी करण्यासाठी दांडी किनाऱ्यावर आले होते. किनाऱ्यावरील रस्ता अरुंद असल्याने स्थानिक युवतीने त्यांना गाडी योग्य पद्धतीने पार्क करण्यास सांगितले. मात्र, याचा राग आल्याने गाडीतील दोन पर्यटकांनी थेट त्या युवतीवर हात उचलला.

युवतीला झालेल्या मारहाणीनंतर गाडीतील इतर पर्यटकांनीही स्थानिक नागरिकांशी हुज्जत घालण्यास आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहताच स्थानिक नागरिक कमालीचे आक्रमक झाले. त्यांनी तातडीने घटनास्थळी गर्दी करत पर्यटकांना गाडीबाहेर येण्याचे आवाहन केले, परंतु पर्यटकांनी गाडीतच बसून वाद सुरू ठेवल्याने स्थानिकांचा राग अनावर झाला. या रागाच्या भरात पर्यटकांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली.

घटनास्थळी वातावरण इतके तंग झाले होते की, आक्रमक झालेल्या स्थानिकांच्या रोषाचा फटका तेथे मध्यस्थीसाठी गेलेले स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस कर्मचारी आणि घटनेचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांनाही बसला.

घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला दोन पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पर्यटकांना सुरक्षेच्या कारणास्तव गाडीतच थांबवून ठेवले आणि स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी पर्यटकांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली.

वाद अधिक चिघळत असतानाच पोलीस निरीक्षक मारुती जगताप आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आक्रमक जमावाची समजूत काढत त्यांना शांत केले. “कायदा हातात न घेता पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार नोंदवा,” अशी समजूत त्यांनी स्थानिकांना घातली.

तणावपूर्ण परिस्थिती पाहता, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत पर्यटकांची मिनी ट्रॅव्हलर आणि सर्व पर्यटकांना दांडी किनाऱ्यावरून सुखरूप मालवण पोलीस ठाण्यात आणले. तसेच किनाऱ्यावर पर्यटकांच्या गाडीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या प्रकरणाची चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

error: Content is protected !!