खारेपाटण येथील घटना
खारेपाटण : तालुक्यातील खारेपाटण येथे घराची साफसफाई करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून दोन सख्खे जुळे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. प्रसाद प्रमोद राणे (३९) आणि सिद्धेश प्रमोद राणे (३९) अशी या जखमी भावंडांची नावे असून, ते मूळचे खारेपाटण कालभैरव कपिलेश्वरवाडी येथील रहिवासी आहेत. सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले हे दोन्ही भाऊ गावी आले होते. सोमवारी दुपारी ३:३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. एका भावाला शॉक लागल्याचे पाहून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी गेला असता, दोघांनाही विजेचा तीव्र प्रवाह लागून ते जागीच जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच खारेपाटणचे पोलीस पाटील अनिकेत जामसंडेकर आणि ग्रामस्थ संदीप पाटणकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने हालचाल केली. दोन्ही जखमींना तातडीने खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांनी तातडीने उपचार सुरू केल्यामुळे दोन्ही राणे बंधूंची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळामुळे खारेपाटण परिसरात मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि वीजवाहिन्या तुटून जमिनीवर पडल्या आहेत, तर घरांची कौले व पत्रे उडून गेली आहेत. सध्या ७५ टक्के भागातील वीजपुरवठा अद्याप खंडितच असून, अशा परिस्थितीत घराची स्वच्छता करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर खारेपाटणचे सरपंच महेंद्र गुरव आणि प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी विद्युत उपकरणांशी संपर्क येताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


Subscribe










