सुमारे 2 लाख 55 हजार रूपये किंमतीचे सात तोळ्यांचे दागिने चोरीस
बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दागिने लांबवले
कुडाळ : बसस्थानकात बुधवारी आठवडा बाजारादिवशी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणा-या एका प्रवाशी महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने असलेले पाऊच अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास घडली. यात जवळपास सात तोळ्यांचे सुमारे 2 लाख 55 हजार रूपये किंमतीचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार सौ. सुप्रिया सचिन पेंडूरकर (वय 39, सध्या रा. अंधेरी – मुंबई, मूळ रा. चौके कुळकरवाडी, ता. मालवण) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
सौ. सुप्रिया पेंडूरकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सविस्तर हकिगत अशी की, त्यांच्या चौके गावी 1 ते 5 मे या कालावधीत धार्मिक कार्यक्रम असल्याने आज बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास त्या आपले पती सचिन यांच्यासमवेत तेजस एक्स्प्रेसने गावी येण्यास निघाले. यावेळी त्यांनी आपले सोन्याचे दागिनेही सोबत घेतले होते. दुपारी 2 वाजताच्या सुमारास तेजस एक्स्प्रेस कुडाळ रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर तेथे उतरल्या. त्यानंतर त्यांनी पर्समधील सोन्याच्या दागिन्यांचे पाऊच सुखरूप असल्याची खातरजमा केली. नंतर रिक्षाने कुडाळ बसस्थानकात आले. 2.45 वाजताच्या सुमारास कुडाळ पेंडूर कट्टा मार्गे मालवणला जाणारी एसटी बस फलाटावर लागली असता, गर्दी असल्याने त्यांचे पती सचिन हे सुरूवातीला बसमध्ये चढले. त्यांच्या पाठोपाठ सौ. सुप्रिया ही बसमध्ये चढल्या. सीटवर बसल्यानंतर त्यांना आपल्याकडील पर्सची चैन अर्धवट उघडी असल्याचे दिसून येताच, त्यांनी पर्समधील सोन्याचे दागिने असलेल्या पाऊचची खातरजमा केली असता, ते पाऊच पर्समध्ये आढळून आले नाही. बसमध्येही शोधाशोध करूनही ते पाऊच आढळून आले नाही. बसच्या चालक व वाहकालाही याबाबत कल्पना दिल्यानंतर बस पोलिस ठाण्याच्या आवारात आणून तपासणी करण्यात आली. मात्र सोन्याचे दागिने आढळून आलेले नाहीत.
त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन अज्ञाताने पर्समधील सोन्याचे दागिने असलेले पाऊच लंपास केल्याचे लक्षात येताच, त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, लक्ष्मीहार, दोन हातातील बांगड्या, एक अंगठी, कानातले बट्टू आदींसह सुमारे 2 लाख 55 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक सखाराम भोई करीत आहेत, अशी माहीती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.


Subscribe









