१६ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हे दाखल
सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा आणि सावंतवाडी पोलिसांनी २७ एप्रिल रोजी संयुक्तपणे मोठी कारवाई केली. सोमवारी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण १६ हजार १०० रुपयांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून ही कारवाई पूर्ण केली.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी कोलगाव, माजगाव आणि कलंबिस्त या तीन गावांमध्ये छापे टाकले. कोलगाव-कुंभयाळ वाडी येथे रवींद्र लक्ष्मण राऊळ (४९) याच्याकडून १० हजार १०० रुपये किमतीच्या सुमारे १०० दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर माजगाव-ख्रिश्चनवाडीत केलेल्या कारवाईत लुईस अंतोन देसा (६१) याच्या ताब्यातून १,९०० रुपयांच्या १९ बाटल्या, तर कलंबिस्त-ख्रिश्चनवाडी येथे झूजे मोतेस रॉड्रिक्स (६७) याच्याकडून ४,१०० रुपये किमतीचा विविध प्रकारच्या १८ बाटल्यांचा साठा हस्तगत करण्यात आला. या तिन्ही आरोपींविरुद्ध अवैध दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पी.एस.आय. सुधीर सावंत, हवालदार प्रकाश कदम यांच्यासह सावंतवाडीच्या पी.एस.आय. श्रीमती मुळीक, हवालदार मनोज राऊत, अमित राऊळ, दीपक शिंदे आणि धोत्रे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. सावंतवाडी परिसरात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत या तिन्ही कारवायांच्या पंचनाम्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती.


Subscribe









