झारापमध्ये राजकीय भूकंप; शिंदे गटाची बाजी

सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावर अविश्वास मंजूर

कुडाळ : झाराप गावाच्या राजकारणात सोमवारी मोठा उलटफेर झाला असून सरपंच दक्षता मेस्त्री यांना आपले पद गमवावे लागले आहे. राज्यात महायुतीत एकत्र असलेल्या भाजपा आणि शिंदे गटात स्थानिक पातळीवर झालेल्या या संघर्षात शिंदे गटाने बाजी मारली. उपसरपंच मंगेश गावकर यांच्या नेतृत्वाखालील गटाने मांडलेला अविश्वास ठराव ग्रामसभेत अवघ्या २० मतांच्या निसटत्या फरकाने मंजूर झाला. एकूण ७३४ मतदारांपैकी ३६६ जणांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केले, तर ३४६ मते विरोधात पडली. या विजयामुळे शिंदे गटाने भाजपाला मोठा धक्का दिला असून स्थानिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

राजकीय संघर्षापेक्षा या ग्रामसभेत प्रशासनाच्या नियोजनाचा उडालेला फज्जा अधिक चर्चेचा विषय ठरला. प्रशासनाने केवळ २५० मतदारांची अपेक्षा केली असताना प्रत्यक्षात ८०० हून अधिक ग्रामस्थ जमल्याने यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. मतदार याद्यांमधील गोंधळ आणि कर्मचाऱ्यांची दिरंगाई यामुळे मतदारांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. अखेर या गैरसोयीला कंटाळून सुमारे ४० टक्के मतदारांनी मतदान न करताच घरी जाणे पसंत केले. निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेमणुकीत ऐनवेळी झालेले बदल आणि नियोजनाचा अभाव यामुळे लोकशाहीच्या या प्रक्रियेत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

ग्रामपंचायतीच्या ८ सदस्यांनी सुरुवातीला हा ठराव मंजूर केला होता, ज्यावर सोमवारी ग्रामसभेने शिक्कामोर्तब केले. पक्षश्रेष्ठींनी युती धर्म पाळण्याचे प्रयत्न करूनही स्थानिक पातळीवरील शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्यापुढे भाजपाला माघार घ्यावी लागली. या निकालानंतर सरपंच दक्षता मेस्त्री यांनी प्रशासकीय गोंधळाचा आपल्या मतांवर परिणाम झाल्याचा दावा केला असून, या संपूर्ण प्रकरणाची तक्रार भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निकालामुळे झारापमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली असून आगामी काळात याचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!