चालक संदीप पाटील यांचा जागीच मृत्यू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे येथील धोकादायक वळणावर रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात खारेपाटण रामेश्वर नगर येथील रिक्षाचालक संदीप दिलीप पाटील (४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संदीप हे आपल्या रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी तळेरे येथे गेले होते. तिथून परतत असताना नडगिवे येथील अवघड वळणावर त्यांचा रिक्षालरील ताबा सुटला आणि रिक्षा पलटी झाली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खारेपाटणचे स्थानिक लोकप्रतिनिधी श्री. गुरुप्रसाद शिंदे आणि माजी सरपंच श्री. रमाकांत राऊत यांनी तातडीने धाव घेत संदीप यांना खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पवन कांबळे, खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे प्रमुख मिलिंद देसाई यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
संदीप पाटील हे रिक्षा चालवून आणि रामेश्वर नगर येथे रिक्षा दुरुस्तीचे छोटे गॅरेज चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पत्नी खारेपाटण आरोग्य केंद्रात ‘आशा सेविका’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून, कष्टाळू कर्त्या पुरुषाच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, नडगिवे येथील हे वळण ‘अपघात प्रवण क्षेत्र’ बनले असून, संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.


Subscribe










