घरगुती व व्यापारी गॅस टंचाई दूर होणार

दीपक नारकर यांच्या पाठपुराव्याला यश

योगिता कानडे / कुडाळ: तालुक्यातील घरगुती आणि व्यापारी गॅस वितरणात निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी खरेदी विक्री संघ कुडाळचे अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच गोवा येथील प्लांट ऑफिसर श्री. गुप्ता यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व त्यांना निवेदनाद्वारे या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती केली.

गेल्या काही दिवसांपासून कुडाळ परिसरात गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अनियमितता जाणवत होती. यामुळे गृहिणींसह व्यापारी वर्गाचेही मोठे हाल होत होते.

दीपक नारकर यांनी स्वतः गोवा येथील गॅस प्लांट ऑफिसर श्री. गुप्ता यांच्याशी चर्चा करून स्थानिक नागरिकांच्या अडचणी मांडल्या. गॅस पुरवठा सुरळीत आणि वेळेत व्हावा, यासाठी त्यांनी लेखी निवेदन सादर केले.

दीपक नारकर यांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत, श्री. गुप्ता यांनी उद्यापासून गॅस पुरवठ्याची गती वाढवण्यात येईल आणि दर दिवशी वीस व्यावसायिक गॅस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जाईल असे सांगितले.

दीपक नारकर यांच्या या तत्परतेमुळे कुडाळ तालुक्यातील गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, येत्या काही दिवसांत गॅस टंचाई पूर्णपणे दूर होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!