एका रात्रीत ८ दुकाने फोडली
चोरटे अनेकांच्या सीसीटीव्हीत कैद
कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यापासून जेमतेम 100 मीटरवर असलेल्या कणकवली – आचरा रस्त्यावरील ८ दुकाने चोरट्यांनी फोडली. या दुकानफोडीच्या घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्या. दरम्यान दुकाने फोडताना चोरटे अनेकांच्या सीसीटीव्ही मध्ये जेरबंद झाले आहेत. त्यानुसार या चोऱ्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे दिसून आले आहे. तर या जबरी दुकानफोड्यांमुळे कणकवली शहरात घबराहट उडाली आहे.
कणकवली – आचरा रस्त्यावर राज मेडिकल आहे. त्याच्या नजिकच काही बेकरी कामगार राहतात. यातील एका बेकरी कामगाराला राज मेडिकलचे शटर काहीसे उघडे दिसले. याबाबतची माहिती मिळताच राज मेडिकलचे मालक घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता मेडिकलचे शटर कोणत्यातरी हत्याराने उचकटलेले दिसले. त्यांनी पाहणी केली असता ड्रॉवरमधील दोन हजार रुपये रक्कम चोरीस गेलेली आढळली.
राज मेडिकलच्या अगदी समोर सना कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समधील महालक्ष्मी पूजा भांडार हे दुकान चोरट्यांनी फोडले. या दुकानाच्या नजीकच महालक्ष्मी पूजा भंडाराचे गोडाऊन असून त्याला देखील चोरट्यांनी लक्ष्य केले अन् ड्रॉवर मधील एक हजार रुपये चोरले.
याच कॉम्प्लेक्समध्ये फेमस टेलर यांचे वर्कशॉप पासून ते देखील चोरट्यांनी फोडले. मात्र तेथे चोरट्यांच्या हाती काही लागू शकले नाही. मात्र याच कॉम्प्लेक्समध्ये एस पी बोरवेल अँड इलेक्ट्रिक वर्क्स हे दुकान असून या दुकानातून जवळपास पंधरा हजार रुपये चोरीला गेले. सना कॉम्प्लेक्स समोर आणि राज मेडिकल च्या बाजूला बाणे किराणा मालाचे दुकान व पान शॉप आहे. या दोन्ही दुकानांना सुद्धा चोरट्यांनी लक्ष्य केले. मात्र तेथे विशेष काही हाती लागू शकले नाही. याच बाजूला स्वामी समर्थ जनरल स्टोअर्स असून ते देखील चोरट्यांनी फोडले. सुदैवाने तेथेही चोरीला काही जाऊ शकले नाही.
पोलिसांकडून पंचनामा
घटनेची माहिती समजतात कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यामध्ये काही दुकानाची शटर कोणत्यातरी हत्यारांनी उचकटलेली तर काही दुकानांच्या शटरची कुलपे फोडलेली असल्याचे आढळले. यावेळी कणकवली शहरातील प्रसिद्ध सुवर्णकार दीपक बेलवलकर, विलास कोरगावकर, श्री. पारकर यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.


Subscribe










