केसरकर यांनी जिल्ह्याला लाभलेल्या राजकीय, सामाजिक व संस्कृतिक वारशाला तडा जाईल असे कृत्य केले
मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला जाहीर निषेध
कुडाळ : भक्तीच्या नावावर भोंदूगिरीच्या नादी लागणारे आमदार दीपक केसरकर यांनी अशोक खरातचे लाभार्थी होऊन फक्त सावंतवाडीचेच नाही तर अख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाक कापण्याचे काम केले आहे. महिलांना दुर्बल करून त्यांच्या असहाय्यतेचा फायदा उठवणाऱ्या खरातचे मदतनीस म्हणून मिळालेली आमदारकी खर्च करणाऱ्या आमदारांनी आता जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. अशी टीका मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली. केसरकर यांनी जिल्ह्याला लाभलेल्या राजकीय, सामाजिक व संस्कृतिक वारशाला तडा जाईल असे कृत्य केले असे म्हणत त्यांनी मनसेच्या वतीने निषेध व्यक्त केला.
सावंतवाडी मतदारसंघातील मळगाव येथील रेल्वे टर्मिनस तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल या प्रश्नावर वेळ नसणाऱ्या आमदारांना नाशिक येथे जाऊन खरातला फाईव्ह स्टार सोयीसुविधा पुरविण्यासाठी आपला कार्यकाळ संपवताना काहीच कसे वाटले नाही.या घृणास्पद कृत्याबद्दल सावंतवाडीच्या जनतेत प्रचंड रोष आहे आणि त्याची किंमत तर येणाऱ्या काळात दिपक केसरकरांना मोजावी लागेलच. परंतु, या संतापजनक प्रकारासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्राची परंपरा अखंडित राखण्याची शपथ मोडणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन यापुढे आपल्या पापांचे प्रायश्चित्त करावे अशा शब्दांत मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी निषेध व्यक्त केला.


Subscribe









