आठ दिवसात जिमखाना खेळण्यायोग्य करा अन्यथा…
मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांचा मुख्याधीकारांना इशारा…
सावंतवाडी प्रतिनिधी:सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान हे खड्ड्यांमुळे मुलांना खेळण्यासाठी त्रासदायक ठरत असल्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष केसरकर यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारत इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसात हे मैदान पुन्हा खेळण्यासाठी योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्याधिकारी यांना घेराव घालून जाब विचारण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.शहरातील ऐतिहासिक जिमखाना मैदानाचीसध्या दुरावस्था झाली असून याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.यात असे म्हटले आहे की, याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार आहे. गेल्यावर्षी हे मैदान एका खाजगी कार्यक्रमासाठी देण्यात आले होते. त्यामुळे मैदानावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. शहरातील क्रीडाप्रेमींनी यावेळी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तातडीने डागडुजी करून हे मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र त्यावेळी मुख्याधिकारी यांनी मुख्य खेळपट्टीची नव्याने माती टाकून डागडुजी करण्यात येणार असल्याचे आश्वासन क्रीडाप्रेमींना दिले होते. मात्र वर्षभरात अशा प्रकारची डागडुजी करण्यात आली नाही. आता परत मैदानावर मातीचे मोठे ढीग रचण्यात आले असून पुढील काम थांबलेलं आहे. त्यामुळे या मैदानावर सरावासाठी येणारे खेळाडू, सामने आयोजीत करणारे आयोजक यांना त्रास सहन करावा लागत आहे. क्रिडा हंगाम सुरू होऊन देखील नगरपालिका प्रशासन सुशेगात असल्यामुळे क्रीडाप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









