ब्युरो न्यूज: एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सौंदाळा (ता. नेवासा) गावात शिवीगाळ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा ठराव ग्रामसभेने घेतला आहे. तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिली. यासाठी पाचशे रूपयांचा दंड आकारला जाणार आहे. सौंदाळा येथे गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल. आई व बहिणीचा कुठलाही दोष नसताना शिवीगाळ करून अर्वाच्च शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो, यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आई, बहिणी, मुलीला आठवले पाहिजे. शिव्या देण्यावर बंदी घालून महिलांचा सौंदाळा गावाने सन्मान केला आहे. ठराव सूचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली. अनुमोदन गणेश आरगडे यांनी दिले.