अगरबत्ती विक्रेता तेजस खटावकर यांचे आकस्मिक निधन

आकेरी येथील घरात आढळला मृतदेह

सावंतवाडी : आपल्या प्रसन्न आणि मनमिळावू स्वभावाने सावंतवाडी शहरात ओळख निर्माण केलेला तरुण अगरबत्ती विक्रेता तेजस खटावकर (रा. आकेरी) याचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. आकेरी येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते, ज्यातूनच ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
​तेजस हा गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी शहरात चालता-बोलता अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करत होता. पदपथावर किंवा दुकानादुकानांत फिरून तो श्रद्धेने आपला व्यवसाय सांभाळत असे. राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्याचे दांडगे जनसंपर्क होते. अनेकांना तो नावाने ओळखत असल्याने तो सर्वांना आपलासा वाटत असे. मात्र, गेल्या १०-१५ दिवसांपासून त्याच्या वागण्यात बदल झाला होता आणि तो काहीसा आक्रमक झाला होता. कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
​गेले चार दिवस तो आकेरी येथील एका घरात वास्तव्यास होता, जिथे आज त्याचा मृतदेह सापडला. स्थानिक ग्रामस्थांनी ही माहिती पोलीस आणि कुटुंबियांना दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुडाळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!