कणकवलीत विद्यार्थिनीला फूटपट्टीने मारहाण

शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

फळ्यावर चित्र काढल्याचा राग ; तपासनंतरच शिक्षेकेचे नाव निश्चित होणार

कणकवली : तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गातील फळ्यावर चित्र काढल्याच्या रागातून संबंधित शिक्षिकेने लाकडी फूटपट्टीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी दुपारी सुमारे २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वर्गातील फळ्यावर चित्रे काढल्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या डाव्या खांद्यावर लाकडी फूटपट्टीने मार दिल्याने तिला दुखापत झाली. शाळेतून घरी आल्यानंतर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर संतप्त पालकांनी संबंधित प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

विद्यार्थिनीच्या वडिलांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत. तपासानंतरच संबंधित शिक्षिकेचे नेमके नाव स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!