कणकवलीत अजितदादा पवार यांना आदरांजली

विविध मान्यवरांनी अजितदादा यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली शहरातील पटवर्धन चौकात आज कणकवली नगरपंचायतीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आर.टी. मर्गज, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, विलास कोरगावकर यांच्यासह विविध मान्यवरांनी अजितदादा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले की, कणकवली नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत २००३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली होती. त्या विजयाचा अजितदादांना मोठा आनंद झाला होता. नगरपंचायतीच्या पहिल्या पर्यटन महोत्सवाला अजितदादा स्वतः उपस्थित राहिलेच, शिवाय मंत्रिमंडळातील सात मंत्र्यांनाही कणकवलीत घेऊन आले होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, शहराच्या विकासातील त्यांचे योगदान विसरता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की, अजितदादांसोबत दहा वर्षे विधीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. निधी वाटपात त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. वेळेची आणि कामाची शिस्त त्यांनी सर्वांना शिकवली. माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सांगितले की, नगरपंचायतीचा ८६ लाख रुपयांचा निधी खर्च न झाल्याने सवलतीसाठी अजितदादांची भेट घेतली होती. त्यांनी शिस्त मोडणार नसल्याचे स्पष्ट करत सवलत देण्यास नकार
दिला, मात्र नगरपंचायतीचे नुकसान होऊ नये म्हणून तातडीने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हे त्यांचे मोठे दातृत्व होते.

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले की, अजितदादांची आर्थिक शिस्त पाहण्यास मिळाली. त्यांच्या साखर कारखान्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करण्यावर त्यांनी भर दिला. आर.टी. मर्गज यांनी सांगितले की, राज्याच्या सर्व खात्यांची सखोल माहिती असलेले अजित पवार हे कडक प्रशासक म्हणून ओळखले जात होते, त्यामुळे अधिकारी वर्गही त्यांचा आदर आणि धाक बाळगत होता. यावेळी माजी आमदार राजन तेली, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे, अॅड. राजेंद्र रावराणे यांच्यासह अन्य मान्यवरांनीही अजित पवार यांच्या आठवणी सांगून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.

error: Content is protected !!