कणकवली भाजी मार्केटच्या विस्तारासाठी महसूल विभागाची जागा नगरपंचायतीकडे वर्ग करण्याची मागणी

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन

सुसज्ज भाजी मार्केट उभारणीसाठी निर्णयाची अपेक्षा

कणकवली : कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील जुन्या भाजी मार्केटलगत असलेली महसूल विभागाची जागा कणकवली नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी कणकवली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष समीर अनंत नलावडे यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कणकवली नगरपंचायत हद्दीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जुने भाजी मार्केट असून, त्यालगत सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांक १९८/१, क्षेत्र ०.०७ हेक्टर इतकी जागा महसूल विभागाच्या ताब्यात आहे. ही जागा नगरपंचायतीकडे वर्ग केल्यास भाजी मार्केटचा विस्तार करून ते अधिक सुसज्ज व सुविधायुक्त करता येईल.

या संदर्भातील पत्रव्यवहार यापूर्वी कोकण विभागीय आयुक्त तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याचेही नलावडे यांनी नमूद केले आहे. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या अधिकारात या प्रस्तावावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित जागा नगरपंचायतीकडे वर्ग करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. यामुळे कणकवलीतील भाजी मार्केटच्या विकासाला चालना मिळून व्यापारी व नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!