राणे-पवार कुटुंबातील ‘राजकारणापलीकडचे’ नाते

आमदार निलेश राणे यांनी घेतली पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी कोकणचे सुपुत्र आणि आमदार निलेश राणे यांनी बारामती येथील पवार निवासस्थानी जाऊन पवार कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

राणे परिवार आणि पवार परिवार यांचे संबंध केवळ राजकीय नसून ते राजकारणापलीकडचे, अत्यंत आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे राहिले आहेत. ज्येष्ठ नेते नारायणराव राणे आणि स्व. अजितदादा पवार यांच्यातील मैत्री सर्वश्रुत होती. हे नाते शब्दांत मांडणे कठीण असल्याचे भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. निलेश राणे यांनी पवार कुटुंबीयांशी संवाद साधून या कठीण काळात त्यांना धीर दिला.

स्व. अजितदादा पवार हे केवळ एक कणखर नेते नव्हते, तर दिवसरात्र जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे आणि आपल्या कार्यशैलीतून स्वतंत्र ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व होते. प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे एक संवेदनशील नेतृत्व हरपल्याची भावना जनमानसात आहे. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबाचेच नव्हे, तर महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे वैयक्तिक नुकसान झाले आहे.

या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी ईश्वर पवार कुटुंबीयांना शक्ती देवो आणि स्व. अजितदादांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना निलेश राणे यांनी यावेळी केली. या भेटीमुळे राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून जपल्या जाणाऱ्या मानवी नात्यांचे दर्शन पुन्हा एकदा महाराष्ट्राला घडले आहे.

error: Content is protected !!