सिंधुदुर्गच्या राजकारणात सतिश सावंत पुन्हा भरारी घेतील – वैभव नाईक

भिरवंडे‌ येथे सतिश सावंत यांचा ६१ वा वाढदिवस उत्साहात साजरा

सतिश सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली : सिंधुदुर्गातील शेतकरी, बागायतदार यांच्या प्रश्नांसाठी सतीश सावंत नेहमीच आवाज उठवत आले आहेत. म्हणूनच सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या खात्यात आंबा व काजू नुकसान भरपाईचे ११० कोटी जमा झाले आहेत. कोणतेही पद नसले तरी पद घेण्याची किमया, ताकद त्यांच्यामध्ये आहे. एखादी जबाबदारी घेतली की ती पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. गेली काही वर्षे सिंधुदुर्गच्या राजकारणात ते काहीसे मागे असले तरी येत्या काळात ते पुन्हा एकदा भरारी घेतील, असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभाप्रमुख व सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त भिरवंडे येथे आयोजित कार्यक्रमात माजी आ. वैभव नाईक बोलत होते. कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक, भिरवंडेकर मराठा समाज मुंबईचे अध्यक्ष यशवंत सावंत, हरकुळबुद्रुक सरपंच आनंद ठाकूर, युवा सेना
तालुकाप्रमुख उत्तम लोके, पं.स. माजी सदस्य मंगेश सावंत, महेंद्र सावंत, महादेव सावंत, सुनील सावंत, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, चेअरमन बेनी डिसोजा, अनिल सावंत, जयवंत सावंत, दिनेश सावंत, विजय सावंत, कुंभवडे माजी सरपंच आपा तावडे, गुरु पेडणेकर, संजय पारकर, गणपत सावंत आदींसह मान्यवर उपस्थित होते.

सतीश सावंत यांच्या सोबत गेले अनेक वर्ष कार्यरत असणारे शेतकरी व कार्यकर्ते आनंद सावंत, नंदू मेस्त्री, बाळा मेस्त्री, बबन दळवी, संदीप सावंत, अमित सावंत, अंतोन डिसोजा आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित महिलांना हळदी-कुंकू देत सन्मानीत करण्यात आले.

सतीश सावंत म्हणाले, गेली ३५ वर्षे राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहताना अनेक विकासाच्या योजना राबविण्यात यश मिळाले. शिक्षणातून पदवी मिळते, मात्र अनुभवातून मोठे ज्ञान मिळत असते. गेल्या सहा वर्षांत आपण अनेक चांगले, वाईट अनुभव घेतले असून एक सक्षम सतीश सावंत म्हणून आपण घडत आहोत. त्यामुळे कुणीही आपला द्वेष, मत्सर करत असतील त्यांनाही निरोगी व दिर्घायुष्य लाभू दे. कुणा विषयी वाईट बोलण्याची बुद्धी रामेश्वराने देऊ नये. येत्या काळात शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे स्वन पूर्ण करण्याची ताकद आपल्याला मिळो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कणकवलीच्या विजयात सतीश सावंत यांचे मोठे योगदान

कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले, राजकारणात चढ उतार हे येत असतात मात्र आत्मविश्वास ढळून चालणार नाही. राजकारणात बाजारुपणा वाढत आहे. त्यामुळे संस्कारी व अभ्यासपूर्ण काम करणारी राजकीय नेतृत्वे ही नव्या दमाने उभे राहणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्याचा हा गौरव संवेदनशील जनतेकडून होतच असतो. कणकवलीतील आपल्या विजयातून हे दिसून आले आहे. न. पं. निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी मानसिक पाठबळ देण्याबरोबरच विजयापर्यंत कसे जाता येईल त्यासाठीचे मोठे मार्गदर्शन सतीश सावंत यांच्याकडून मिळाले. त्यामुळे येत्या काळात सतीश सावंत नव्या जबाबदारीत दिसतील असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी कणकवली न.पं. च्या निवडणुकीवर भाष्य करताना सतीश सावंत हे मार्गदर्शक नसते तर शहर विकास आघाडीची मूठ बांधू शकलो नसतो. आम्हाला प्रोत्साहन देण्याचे मोठे काम त्यांनी केले, असे सांगितले.

आनंद उर्फ बंडू ठाकुर म्हणाले की, सतिश सावंत हे वैचारिक आणि संस्कारिक व्यक्तीमत्व आहे.त्यांचा नेहमीच दोन मंदिराकडे लक्ष असतो एक भिरवंडे चे रामेश्वर मंदिर आणि दुसरे कनेडी प्रशालेचे ज्ञान मंदिर.त्यांनी भिरवंडे गावचा सर्वांगीण विकास केला आहे.म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसाला भिरवंडे वासीयांची गर्दी दिसून येत आहे. गावकऱ्यांनी त्यांना भरभरून प्रेम दिले आहे .म्हणूनच भिरवंडेचा विकास हा केंद्रबिंदू मानून आपले कर्तव्य ते जबाबदारीने पार पाडत आहेत.

आज रथसप्तमी आणि देव रामेश्वराच्या हरीनाम सप्ताहादिवशी सावंत साहेब यांचा वाढदिवस हा दुग्ध शर्करा योग आहे.देव रामेश्वरावर दृढ श्रद्धा असल्याने म्हणूनच हा योगायोग आला असेल.असे आनंद उर्फ बंडू ठाकुर यांनी सांगितले.

सतिश सावंत हे वैचारिक आणि संस्कारिक व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर पडला.म्हणूनच आम्ही संस्कारीक बनलो.आज माझ्या राजकीय कारकीर्दीत सावंत साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे.म्हणूनच मी हरकुळ बुद्रुक गावचा प्रथम नागरिक बनलो.मी गेली २५ वर्षे सावंत साहेबांच्या सोबत आहे.म्हणूनच वैभव नाईक म्हणाले की,बंडू ठाकुर सतिश सावंत यांची सावली आहे.होय आम्ही सावंत साहेब यांची सावली आहोत.आणि आमच्या सारखे असंख्य कार्यकर्ते सावंत साहेबांची सावली आहेत.खरचं सावंत साहेब हे प्रेमळ आणि सुसंस्कृत आणि समाजप्रिय आहे.असे गौरवोद्गार बंडु ठाकुर यांनी काढले.

भिरवंडेकर मराठा समाजाचे अध्यक्ष यशवंत सावंत, उत्तम लोके आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक सुमन दळवी यांनी मानले.

error: Content is protected !!