महावितरणच्या कबुलीनंतर धीरज श्रीधर मेस्त्री यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

कणकवली : कलमठ सुतारवाडी पिंपळपार येथील सभामंडपावरून जाणाऱ्या धोकादायक उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य धीरज श्रीधर मेस्त्री यांचे सुरू असलेले उपोषण महावितरण अधिकाऱ्यांच्या कबुलीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित काम येत्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची कबुली दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला असून, जर ३१ जानेवारी २०२६पर्यंत काम पूर्ण झाले नाही, तर कलमठ पिंपळपार येथून थेट महावितरण कार्यालयापर्यंत भव्य ‘लाँग मार्च’ काढण्यात येणार आहे.

या आंदोलनाद्वारे ग्रामस्थांनी वारंवार निवेदन, पत्रव्यवहार आणि कायदेशीर नोटीस देऊनही होत असलेल्या ढिसाळ व तात्पुरत्या उपाययोजनांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या उच्चदाब वाहिन्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली होती.

उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी लढा थांबलेला नसून प्रशासनाच्या कृतीकडे ग्रामस्थांचे लक्ष कायम राहणार आहे, असे धीरज श्रीधर मेस्त्री यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच महावितरणला काबुली द्यावी लागली असून, आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

error: Content is protected !!