साहित्य, विज्ञान प्रसार आणि संदेशपत्र संग्रह क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव; कणकवलीत मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार
कणकवली : दैवज्ञ हितवर्धक समाज, कणकवली यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात कलमठ येथील ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय हिर्लेकर आणि तळेरे येथील संदेशपत्र संग्राहक तथा अक्षरोत्सव प्रमुख निकेत पावसकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनय शिरोडकर होते. व्यासपीठावर कणकवली नगरसेवक संजय कामतेकर, कणकवली व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर, दैवज्ञ हितवर्धक समाज कणकवलीचे अध्यक्ष मोहन तळगावकर, विलास जामसंडेकर, ज्येष्ठ सुवर्णकार सुरेश मालडीकर, सन्मानमूर्ती दत्तात्रय हिर्लेकर, निकेत पावसकर, संतोष कुडाळकर, तनय पावसकर, सुधीर कुबल, सुप्रिया महाजन, अरविंद शिरोडकर, मधुकर मालडीकर तसेच दैवज्ञ महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा बेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दत्तात्रय हिर्लेकर यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली असून साहित्य, विज्ञान प्रसार आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे प्रकाशन झाले असून अलीकडेच त्यांच्या एका पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘मानव आणि विज्ञान’ हे त्यांचे पुस्तक इयत्ता तिसरी व सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आले आहे. तसेच ‘ठुमकत मुरडत नाट्यछटा’ या पुस्तकातील नाट्यछटा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सादर करण्यात आल्या आहेत.
निकेत पावसकर यांनी गेली २० वर्षे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ताक्षरातील संदेशपत्रांचा संग्रह जतन केला आहे. त्यांच्या संग्रही देश-विदेशातील १८०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यवरांची संदेशपत्रे आहेत. या संग्रहाची राज्यासह राज्याबाहेर अनेक ठिकाणी प्रदर्शने भरविण्यात आली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून सह्याद्री वाहिनी आणि आकाशवाणीवरही त्यांच्या कार्याविषयी मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.
यावेळी दत्तात्रय हिर्लेकर यांनी मनोगत व्यक्त करत साहित्य, संस्कार आणि ज्ञानसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
दोन वेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्वाचा गौरव
दैवज्ञ हितवर्धक समाजाच्या या कार्यक्रमात साहित्य, विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे दत्तात्रय हिर्लेकर तसेच ऐतिहासिक, कला, साहित्य, सांस्कृतिक ठेवा जपणारे संदेशपत्र संग्राहक निकेत पावसकर यांचा गौरव करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचा समाजाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.



Subscribe










