कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्यात भाजपला बंडखोरीची फटका बसला आहे . नाटळ, हरकुळ खुर्द, फोंडाघाट या तिन्हा जिल्हा परिषद मतदारसंघात तर कलमठ, खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघातही भाजप अंतर्गत बंडखोरी उफाळली आहे. भाजपचे माजी कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, फोंडघाटचे राजन चिके, सुरेश सावंत, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडाचे निशाण रोवले आहे.
कणकवली तालुक्यातील ८ जि. प. परिषद जागांसाठी ३७ उमेदवारी दाखल झाले आहेत. पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय येथे उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, उमेदवारांची संख्या असल्याने ३ वाजेपर्यंत दाखल असलेल्या उमेदवारांना तहसीलदार कक्षात घेत ४.३० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात आले. तीन मुख्य दरवाजा बंद करत उमेदावारांना कक्षात घेण्यात आले होते. शेवटच्या दिवशी प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण पडल्याचे दिसून आले.
कणकवली तालुक्यातील जि. प. च्या ८ पैकी सहा जागा भाजपला तर २ जागा शिंदे शिवसेनेला असा फॉम्युर्ला ठरला होता. तर पंचायत समितीच्या १६ जागांपैकी खारेपाटण, ओरसगाव या दोन जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत होईल , असा अंदाज होता. मात्र, भाजपला मोठ्या प्रमाणात बंडखोरीला सामोरे जावे लागले आहे.
माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी नाटळ आणि हरकुळ खुर्द दोन मतदारसंघांवर दावा केला होता. नाटळ मतदारसंघातून स्वत: तर हरकुळ खुर्द मतदारसंघातून सौ. संजना सावंत यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. मात्र, पक्षाने गोट्या सावंत यांना नाटळमधून उमेदवारी दिली. परंतु संजना सावंत यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्याऐवजी भाजपचे कणकवली विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे यांना हरकुळ खुर्द मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे सौ. संजना सावंत हरकुळ खुर्द व नाटळ मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्याचप्रमाणे कासार्डे जि. प. मतदारसंघातून इच्छुक भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांना उमेदवारी नाकाराल्याने त्यांनी फोंडाघाट व हरकुळ खुर्द मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याबरोबरच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती सुरेश सावंत यांनी नाटळ व हरकुळ खुर्द मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. फोंडाघाट जि. प. मतदार संघातून भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजन चिके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बंडोबांना थंड करण्याचे आव्हान भाजपच्या नेतृत्वासमोर आहे.
पंचायत समिती मतदारसंघांतही बंडखोरी भाजपला कणकवली तालुका पंचायत समिती मतदारसंघांतही बंडखोरीचा सामना करावा लागत आहेत. खारेपाटण मतदारसंघातून माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कलमठ मतदारसंघातून विजय चिंदरकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण रोवले आहे. त्यामुळे २७ जानेवारीला उमेदवारी अर्ज कोण मागे घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Subscribe









