कुडाळमध्ये राजकीय रणधुमाळी!

जिल्हा परिषदेसाठी ४८ तर पंचायत समितीसाठी ६४ उमेदवारांचे अर्ज

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने दंड थोपटल्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार आणि चुरशीची होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.
जिल्हा परिषद: ९ जागांसाठी ४८ उमेदवार मैदानात
कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ मतदारसंघांसाठी एकूण ४८ जणांनी आपले नशीब आजमावण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये पिंगळी मतदारसंघात सर्वाधिक ११ उमेदवारांचे अर्ज आल्याने सर्वांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.
मतदारसंघनिहाय अर्जांची संख्या:
पिंगुळी: ११
पावशी: ९
वेताळ बांबर्डे: ७
नेरुळ देऊळवाडा: ४
तेंडोली: ४
माणगांव: ४
आंब्रड: ३
ओरोस बु्द्रुक: ३
घावनळे: ३
पंचायत समिती: १८ गणांत ६४ जणांची दावेदारी
पंचायत समितीच्या १८ गणांसाठी एकूण ६४ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये वेताळ बांबर्डे, ओरोस बुद्रुक आणि माणगांव या गणांमध्ये प्रत्येकी ५ उमेदवारांनी अर्ज भरल्याने येथे बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
प्रमुख गणांमधील अर्जांची स्थिती:
आंब्रड (४), जांभवडे (४), आवळेगाव (४), वेताळ बांबर्डे (५), ओरोस बुद्रुक (५), कसाल (४), पिंगुळी (४), साळगाव (४), माणगांव (५). तर पाट आणि गोठोस गणांमध्ये प्रत्येकी २ अर्ज दाखल झाले आहेत.
बंडखोरी रोखण्याचे पक्षांसमोर आव्हान
अनेक मतदारसंघांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध स्वकीयांनीच अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. ही ‘बंडखोरी’ आगामी काळात निवडणुकीच्या गणितावर मोठा परिणाम करू शकते. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत ही बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आता राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर असणार आहे.
प्रमुख पक्षांच्या व्यूहरचनेला अपक्ष उमेदवार किती सुरुंग लावतात आणि मतदारांचा कौल कोणाकडे जातो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

error: Content is protected !!