बांदा येथे ८ महिन्यांच्या बाळाला सोडून महिला बेपत्ता

१० दिवसांनंतरही पोलिसांना यश नाही

बांदा : आपल्या अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याला सोडून अचानक बेपत्ता झालेल्या पूजा चौहान या महिलेचा १० दिवस उलटल्यानंतरही अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बांदा पोलिसांनी शोधमोहीम तीव्र करत दोन स्वतंत्र पथके विविध ठिकाणी रवाना केली होती. मात्र, कोणतीही ठोस माहिती अथवा सुगावा न मिळाल्याने दोन्ही पथके रिकाम्या हाताने परतली आहेत. या गूढ घटनेमुळे बांदा परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा चौहान या २१ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला सोडून अचानक गायब झाल्या. त्या ज्या कुटुंबाकडे वास्तव्यास होत्या, त्यांनी सर्वत्र शोध घेऊनही त्या आढळल्या नाहीत. अखेर याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. आई अचानक निघून गेल्याने बांदा पोलिसांनी तत्परता दाखवत बाळाला बालकल्याण समितीकडे सोपवले. बाल रुग्णालयात चार दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवल्यानंतर, बाळाच्या पुढील संगोपनासाठी त्याला चिपळूण येथील बालसंगोपन संस्थेकडे पाठवण्यात आले आहे.

या तपासात पोलिसांसमोर दोन मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. एक म्हणजे, महिला ज्या कुटुंबाकडे राहत होती, त्यांच्याकडे तिची कोणतीही अधिकृत ओळखपत्रे किंवा कागदपत्रे उपलब्ध नाहीत. कोणतीही खातरजमा न करता अनोळखी महिलेला घरात कसे आश्रयाला ठेवले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दुसरा अडथळा म्हणजे, महिला बेपत्ता झाली तो दिवस मंगळवार असल्याने परिसरात वीजपुरवठा खंडित होता. यामुळे परिसरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना महत्त्वाचे फुटेज मिळू शकले नाही.

दरम्यान, पूजा चौहान यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या महिलेबाबत किंवा तिच्या हालचालींविषयी कोणाकडेही काही माहिती अथवा शंका असल्यास, त्यांनी न घाबरता तात्काळ बांदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!