सन 2024-25 पासून मंजुरी मिळालेल्या घरकुल लाभार्थ्यांना मिळणार लाभ
शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडेंची माहिती
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ तसेच, विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून रु.५०,०००/- एवढे अतिरिक्त अनुदान ग्राम विकास विभागांतर्गत देण्यात येणार आहे. यासंदर्भात मंजूर अनुदान वितरणासाठी नविन लेखाशिर्ष उघडणेबाबत ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला असून लवकरच जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.”सर्वांसाठी घरे” हे केंद्र शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न महायुती सरकारकडून केले जात आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या कालावधीसाठी सुरु केला असून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झालेली आहे.महायुती सरकारच्या या निर्णयाचे ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या आनंदाने स्वागत केले असून सर्व सामान्यांच्या मनातील घराचे स्वप्न सत्यात उतरणार असल्याची माहिती शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


Subscribe





