परतीचा पाऊस आणि हत्तीचा वावर
आमदार निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
सिंधुदुर्ग: कोकणात पावसाळ्याचा हंगाम संपूनही गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून, यामुळे शेती आणि बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेले भात, नाचणी आणि आंबा (पुढील हंगामाची तयारी) या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने येथील शेतकरी आणि बागायतदार पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. सततच्या पावसामुळे भात पीक शेतातच कुजून गेले आहे, तर कापणी करून वाळत ठेवलेल्या भातालाही कोंब फुटू लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरले आहे. अनेक ठिकाणी भाताच्या पेंडी पाण्यावर तरंगत असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
एकीकडे परतीच्या पावसाने रडवले असताना, दुसरीकडे जिल्ह्यात वाढलेल्या हत्तींच्या वावरामुळे शेती आणि बागायतीचे नुकसान वाढत आहे, ज्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत स्थानिक आमदार निलेश राणे यांनी तातडीने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कोकणातील शेतकऱ्यांची ही व्यथा कळवणार असल्याचे जाहीर केले आहे.
कोकणातील शेतीच्या नुकसानीबाबत माध्यमांमध्ये पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे नमूद करत, आमदार राणे यांनी या विषयावर गांभीर्याने चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेटीची वेळही मागितली आहे. या अडचणीच्या काळात सरकार आमच्या शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना निश्चितच दिलासा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Subscribe










