मुंबईतील बेपत्ता तरुणाचा कुडाळात आत्महत्येचा प्रयत्न

विष प्राशन करून नस कापली, बेळगावच्या पर्यटकांमुळे वाचले प्राण

कौटुंबिक वादातून उचलले पाऊल

मुंबई येथून बेपत्ता असलेल्या एका तरुण कर्मचाऱ्याने कुडाळ शहरात विष प्राशन करून व हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत गंभीर घटना घडली आहे. सुदैवाने, या तरुणाला नस कापताना बघितल्यावर बेळगाव येथील पर्यटकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचले. या पर्यटकांनी तत्काळ त्याला कुडाळ पोलीस स्टेशनमार्फत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

पर्यटकांनी ओळखले घटनेचे गांभीर्य

बेळगाव येथील काही पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आले होते. मालवणहून परतत असताना वाटेत थांबले असताना त्यांना एक तरुण जखमी अवस्थेत आढळला. या पर्यटकांनी विलंब न करता त्याला थांबवून चौकशी केली. त्यावेळी त्याने आपण विष प्राशन केल्याचे सांगितले. घटनास्थळी उलटी केलेली असल्याने पर्यटकांना परिस्थितीचे गांभीर्य त्वरित लक्षात आले. कोणताही वेळ न दवडता, या पर्यटकांनी माणुसकी दाखवत तरुणाला त्वरित आपल्या गाडीतून थेट कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये आणले.

पोलिसांनी तातडीने केले रुग्णालयात दाखल

घडनेचे गांभीर्य लक्षात घेत कुडाळ पोलिसांनी त्वरित हालचाली केल्या. त्यांनी या तरुणाला तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचाराअंती त्याची स्थिती काहीशी स्थिर असल्याचे समजते.

कौटुंबिक वादातून उचलले पाऊल

हा तरुण मुंबईत एअरपोर्टवर कामाला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून त्याने कौटुंबिक वादातून गेल्या दोन दिवसांपूर्वी आपले मुंबई येथील घर सोडल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतची तक्रार मुंबई येथील संबंधित पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, हा तरुण कुडाळ येथे अशा परिस्थितीत सापडल्यानंतर, पोलिसांनी तातडीने त्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ गावी असलेल्या तसेच मुंबईतील नातेवाईकांना या दुर्घटनेची माहिती दिली आहे.

बेळगावच्या पर्यटकांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका युवकाचा जीव वाचला असून, पोलिसांकडून या घटनेची पुढील चौकशी सुरू आहे.

error: Content is protected !!