
रुपेश पावसकर यांचा अधिकाऱ्यांना सवाल…
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण झाले आहे. डॉक्टरांची अनुपस्थिती आणि राजीनाम्यांमुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून “आरोग्य यंत्रणा कधी सुरळीत होणार?” असा थेट आणि संतप्त सवाल जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी बैठकीदरम्यान उपस्थित केला. बैठकीत चर्चेदरम्यान डॉक्टरांच्या सततच्या अनुपस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. डॉ. श्रीपाद पाटील आणि डॉ. वाळके यांच्या राजीनाम्याबाबत व सेवा निवृत्ती (VRS) घेण्याच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.एखादा डॉक्टर रजेवर किंवा अनुपस्थित असल्यास पर्यायी (स्पेयर) डॉक्टर उपलब्ध का नाही, असा सवाल करत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर पावसकर यांनी निशाणा साधला.महिला रुग्णांचे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले डॉक्टरांकडून राजीनामा किंवा रजेसाठी ‘वैयक्तिक कारणे’ सांगितली जात असली, तरी प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम करण्यास रस असणे किंवा इतर कारणांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याचे मत मांडले गेले.आरोग्य विभागाच्या या गोंधळामुळे सामान्य जनतेला आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने प्रशासनाने यावर तात्काळ ठोस उपाययोजना करावी, अशी आक्रमक मागणी या वेळी करण्यात आली.



Subscribe










