कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पालकमंत्री नितेश राणेंची धडक एन्ट्री
तिलारी घाटातून गोव्यात गोमांस वाहतूक करणारी कार स्थानिक कार्यकर्त्यांनी अडवून जाळल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात वातावरण चांगलेच तापले. या घटनेनंतर पोलिसांनी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले. पोलिस कारवाईदरम्यान झालेल्या झटापटीतून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परिणामी गावात व तालुक्यात मोठी खळबळ उडाली आणि राजकीय व धार्मिक वातावरण तणावपूर्ण झाले.
| पोलिस ठाण्याबाहेर तणाव..
कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पसरताच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यासमोर जमले. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी गोमांस तस्करीला आळा घालण्याची मागणी केली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
पालकमंत्री नितेश राणे यांची धडक भेट..
घटनांची माहिती मिळताच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे रात्री उशिरा दोडामार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्यासोबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पत्रकार व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राणे यांनी भूमिका स्पष्ट केली.
| नितेश राणे काय म्हणाले?
“आपल्या हिंदू धर्मासाठी लढणाऱ्या मुलांना कोणताही त्रास होऊ देणार नाही. ते सर्व सुखरूप आहेत. त्यांना योग्य दर्जाचा वकील मिळवून लवकरच बाहेर काढले जाईल. कार्यकर्त्यांनी चिंता करू नये,” असा ठाम शब्द राणे यांनी दिला.
“गोमांस तस्करी करणाऱ्यांना चांगला धडा मिळाला आहे. या सीमारेषेतून असा संदेश गेला पाहिजे की, पुन्हा कोणी अशी हिंमत करणार नाही,” असेही ते म्हणाले. “राज्यात आपली सत्ता आहे. मी पालकमंत्री आहे. त्यामुळे हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही,” अशी ग्वाहीही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते म्हणाले – “सर्वांनी शांतता राखा. कायद्याने योग्य तो मार्ग निवडू. पण हिंदू धर्माविरुद्ध जाणाऱ्यांना सोडले जाणार नाही.”
भाजप नेत्यांची उपस्थिती..
या भेटीदरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप सरचिटणीस महेश सारंग, तसेच तालुक्यातील अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता.
गोमांस तस्करीविरोधात कार्यकर्त्यांनी केलेल्या थेट कारवाईमुळे दोडामार्ग तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी पालकमंत्री नितेश राणे यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेने गोमांस तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.



Subscribe









