रोख रक्कम, एक कॅमेरा आणि अन्य काही वस्तू लंपास
कुडाळ : तालुक्यातील कामळेवीर येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास, गिरीश आळवे यांच्या बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी घरातून रोख रक्कम, एक कॅमेरा आणि अन्य काही वस्तू लंपास केल्या आहेत. माणगाव येथील आपल्या फोटो स्टुडिओवर जाण्यासाठी गिरीश आळवे नेहमीप्रमाणे सकाळी घर बंद करून बाहेर पडले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास आळवे यांचे घर फोडले.
चोरट्यांनी सुरुवातीला घराच्या मागील बाजूचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात यश आले नाही. त्यानंतर, त्यांनी घराच्या पुढील दरवाजाचे कडी-बॅकेट उघडून घरात प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी घरातील दोन्ही कपाटे फोडून त्यातील मौल्यवान ऐवज चोरला. या घटनेची माहिती घरमालक गिरीश आळवे यांनी तत्काळ वेंगुर्ला १०० या हेल्पलाईनवर दिली आहे. तसेच, त्यांनी गावातील पोलीस पाटील यांनाही या चोरीबद्दल कळवले आहे. या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


Subscribe








