चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ, प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका – नृत्याचा सुरेख प्रवास’ या व्यावसायिक डान्स शो चा पहिला प्रयोग शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी सर्व कलाकारांनी सादरीकरण पाहून सगळेच मंत्रमुग्ध झाले होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर, अकॅडमीचे सल्लागार सुनिल भोगटे आणि तारकांचे निर्माते उद्योजक उमेश पाटील यांचे मुक्तकंठाने कौतुक केले.
यानंतर खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. चौसष्ठ कलांचा स्वामी असणाऱ्या गणरायाला आणि नृत्याची देवता अर्थात नटराजला वंदन करून चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या ‘तारकांनी’ आपली कला सादर केली.
सुरवातीला नृत्याच्याच माध्यमातून नृत्याची देवता असलेल्या मुद्रेचा अर्थ नृत्याच्याच माध्यमातू सांगण्यात आला. भारतीय आणि पाश्चात्य नृत्याचे विविध प्रकार यावेळी सादर करण्यात आले. यावेळी सेलिब्रिटी नृत्यांगना कु दिक्षा नाईक व सहकलाकारांनी सादर केलेले ‘सैय्या’ या गाण्यावरचे नृत्य पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. कलाकाराचं त्याच्या कलेशी असणारं नातं या सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्यात आलं.
यानंतर ‘तारका’ या शो चा एकमेव पुरुष कलाकार असणाऱ्या निखिल कुडाळकर याने ‘लल्लाटी भंडारं’ या गाण्यावर केलेल्या सादरीकरणामुळे वातावरणात उत्साह संचारला. यावेळी निखिल यांच्या चेहऱ्याचे हावभाव आणि डोळे पाहून सर्वांच्या अंगावर शहारे आले. यानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीतावर सादर केलेले नृत्य पाहून सर्वांचा उर अभिमानाने भरून आला. यानंतर ‘तारका’ या शोच्या शीर्षक गीतावर सादर केलेले नृत्यावर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला.
कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार तथा निवेदक निलेश उर्फ बंड्या जोशी यांनी चिमणी पाखर डान्स अकॅडमी, अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे, ‘तारका’ या शो चे निर्माते उद्योजक उमेश पाटील आणि तारकाच्या सर्व कलाकारांचे भरभरून कौतुक केले. ‘तारका’ हा शो भविष्यात एक मोठा टप्पा वाटेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ‘तारका’ या शो ची केवळ एक झलक पाहून काही जणांनी या शो चे ॲडव्हान्स बुकिंग देखील केले. अशा प्रकारे मान्यवर आणि कला रसिकांच्या उपस्थितीत तारकाचा पहिला शो उत्साहात संपन्न झाला.













