सावंतवाडी : ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट १०० फूट दरीत कोसळून अपघात घडला. सुदैवाने यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुमित दत्ताजी उजवे (वय ३४, रा. नागपूर, आठवा मैल, दौलामेटी, माळा कॉलनी) असे त्याचे नाव आहे. ही घटना आंबोली घाटातील नानापाणी वळणावर घडली. दरम्यान या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुमीत उजवे हा चालक पावडर घेऊन आयशर टेम्पो मधून नागपूरहून गोव्याकडे जात होता. आंबोली घाटातील नाना पाणी वळणावर आला असता अचानक टेम्पोचे ब्रेक निकामी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावरून खाली दरीत कोसळला.
हा टेम्पो १०० फूट खोल दरीत कोसळूनही दैव बलवत्तर म्हणून चालक सुमीत उजवे यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि चालकाला बाहेर काढले. या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.