सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. गावोगावी जाणारे आंतरिक रस्ते, मुख्य मार्गावरील खड्डे तसेच पावसाळ्यामुळे खराब झालेल्या महामार्गांच्या स्थितीची माहिती बैठकीत मांडण्यात आली. तातडीने खड्डे बुजविणे, दुरुस्तीची गुणवत्ता सुनिश्चित करणे आणि ठेकेदारांची जबाबदारी ठरविणे या बाबींवर द्यावा असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बागुल, सावंतवाडी विभागाच्या कार्यकारी अभियंता पुजा इंगवले, राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण तसेच जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.