शॉर्ट सर्किटने घेतला तरुणाचा बळी!
कुडाळ येथील नवोदित कॉम्प्लेक्समधील हृदयद्रावक घटना
कुडाळ येथील केळबाईवाडी परिसरातील एका नव्याने बांधण्यात आलेल्या कॉम्प्लेक्समध्ये अंतर्गत विद्युत जोडणीचे काम करताना मंगळवारी विजेचा जोरदार झटका बसून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शुभम गणपत कोकरे (वय १९, मूळ रा. खेर्डी दत्तवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, सध्या रा. कुडाळ) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. कामादरम्यान घडलेल्या या अनपेक्षित दुर्घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर कॉम्प्लेक्समध्ये लाईट फिटिंगचे काम करण्यासाठी शुभम आपल्या कुटुंबातील सदस्यांसह कुडाळ येथे आला होता. मंगळवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास ब्रेकरच्या साहाय्याने काम करत असताना, ब्रेकरची वायर शॉर्ट असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. वीजप्रवाह सुरू असतानाच अचानक त्याला विजेचा भीषण धक्का बसला आणि तो जागीच बेशुद्ध होऊन खाली कोसळला.
घटनेनंतर उपस्थितांनी शुभमला तातडीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने अखेर त्याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेप्रकरणी पोलीस हवालदार सखाराम भोई अधिक तपास करत आहेत.


Subscribe










