वेंगुर्ला : वृद्ध नागरिकांना पोलीस असल्याचे भासवून त्यांची फसवणूक करणाऱ्या इराणी टोळीतील आणखी एका आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. आरोपीला सांगली रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्याला पुढील कारवाईसाठी वेंगुर्ला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
वृद्ध नागरिकांना लुटून पळ काढल्याचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी याच टोळीतील अबू तालीम मुसा इराणी या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगलीतून अटक केली होती. आता 17 ऑगस्ट 2025 रोजी याच गुन्ह्यात आणखी एक आरोपी, उनमत युसुफ इराणी (वय 32), रा. सांगली रेल्वे स्टेशन जवळ, इराणी वस्ती, सांगली, यालाही मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
मा. डॉ. श्री. मोहन दहिकर (पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग) आणि मा. कुमारी नयोमी साटम (अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल हाडळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनुपकुमार खंडे, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोंसालविस, आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा समावेश होता.
एलसीबीच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Subscribe










