७ लाखांच्या दारूसह तब्बल १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कणकवली : दारिस्ते-पवारवाडी येथे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत ६ लाख ९० हजार २३० रुपयांची दारू आणि स्विफ्ट कार असा एकूण १२ लाख २० हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नितीन ज्ञानदेव वासुदेव (३४, रा. भेंडकुडे वासुदेव गल्ली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारिस्ते-पवारवाडी येथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सिल्वर रंगाची स्विफ्ट कार तपासणीसाठी थांबवली. तपासणी केली असता गोवा बनावटीच्या विविध बॅन्डच्या दारुचे ३१ बॉक्स आढळून आले. सुमारे ६ लाख ९० हजार २३० रु. किमतीची दारू व ६ लाखाची कार असा एकूण १२ लाख ९० हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर व सिंधुदुर्ग अधिक्षक किर्ती शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवलीचे निरिक्षक नितीन शिंदे, जवान स्नेहल कुवसेकर, अजित गावडे, वाहनचालक हेमंत वस्त यांनी केली. कारवाईसाठी साजीद शाहा, सलाउद्दीन खान यांनी मदत केली.

Subscribe










