वेंगुर्ला – वेंगुर्ला एसटी आगारात एका वाहतूक नियंत्रकाला मारहाण केल्याच्या प्रकरणी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने कठोर कारवाई केली आहे. याप्रकरणी शिस्तभंगाचा ठपका ठेवत एकूण ११ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये वेंगुर्ला आगारातील १० आणि कुडाळ आगारातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियंत्रकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर एसटी महामंडळातर्फे तातडीने चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशीत कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन आणि मारहाणीची बाब समोर आल्यानंतर विभागीय कार्यालयाने हे निलंबनाचे पाऊल उचलले आहे.
या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त राखण्याचा संदेश एसटी प्रशासनाने दिला आहे. निलंबित कर्मचाऱ्यांवर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.