मालवण तालुक्यातील घटना
मालवण : जळालेल्या स्थितीत सापडून आलेल्या कुंभारमाठ येथील अमीत शरद गावठे (42) या तरूणाचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. याबाबत पोलीसाना माहिती दिल्या नंतर पुढील कार्यवाही सूरू होती. अमीत गावठे हा काही दिवसांपूर्वीच मुंबईहून मालवण कुंभारमाठ येथील आपल्या घरी आला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कुंभारमाठ स्वयंभूवाडी येथे अमित गावठे हा तरुण एकटाच घरात राहत होता. शनिवारी दुपारी त्यांच्या घरातून आगीच्या ज्वाळा, धुर दिसून येत होता. अमित याचे घर स्लॅबचे असल्याने व आगीच्या वेळी खिडक्या दारे बंद असल्याने आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांना कळले नाही. मात्र, आगीमुळे खिडक्यांच्या काचा फुटून धूर बाहेर येत होता. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेत दरवाजा फोडून आत प्रवेश केला असता अमित हा मोठ्या प्रमाणावर जळालेल्या स्थितीत आढळून आला. तसेच घरातील इतर साहित्यही आगीत जळून गेले होते. ग्रामस्थांनी आग विझवत तातडीने अमित याला रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र ८० ते ९० टक्के भाजलेल्या अमित याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अमित गावठे हा यापूर्वी मुंबईत राहत होता. मुंबईत तो फोटोग्राफर व सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करायचा. काही महिन्यापूर्वीच तो मुंबईहून गावी परतला होता व येथील घरात एकटाच राहत होता. मात्र घरात आग कशी लागली याचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस पाटील बावकर यांनी माहिती दिल्या नंतर पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत माहिती घेतली. पुढील तपास सुरु असल्याचे त्यांनी माहिती देताना सांगितले