दुचाकीस्वार जखमी; कारचालकासह तिघे जंगलात पळाले
सावंतवाडी : येथील इन्सुली घाटात एका दुचाकीला धडक देऊन कारमधील तिघे जण जंगलात पळून गेल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारांसाठी गोव्यातील बांबुळी येथे हलवण्यात आलं आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
अपघात आणि पळून जाण्याचा प्रकार
माडखोल येथील रहिवासी मंगेश सरदेसाई हे आपल्या दुचाकीवरून गोव्याला कामासाठी जात असताना इन्सुली घाटातील सात जांभळी देवस्थानाच्या पुढे त्यांच्या दुचाकीला एका इर्टिगा कारने जोरदार धडक दिली. धडकेमुळे सरदेसाई गंभीर जखमी झाले. अपघात होताच कारमधील चालक दानिश सिद्दीकी (मूळ रा. मध्यप्रदेश, सध्या रा. गोवा) आणि इतर दोन साथीदार गाडी तिथेच सोडून जंगलाच्या दिशेने पळून गेले.
जखमींवर उपचार सुरू
अपघात घडल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ जखमी सरदेसाई यांना सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
पोलिसांनी तपास सुरू केला
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस मयुर सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला. चौकशीत असं समोर आलं आहे की, संशयित चालक दानिश सिद्दीकीने गाडी मालकाला कोणतीही माहिती न देता गाडी घेतली होती. पोलिसांनी आता फरार आरोपी सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. तसेच गाडी मालकालाही चौकशीसाठी सावंतवाडीत बोलावण्यात आलं आहे.