कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शास्त्रीय संगीत वर्गाचे उद्घाटन बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमाला शाळा समिती सदस्य श्री. संजय वासुदेव नाईक, प्रशांत नाईक, श्रीमती मांजरेकर (हुमरमळा) हे उपस्थित होते. या उपक्रमासाठी हार्मोनियम व पखवाज खरेदीसाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्यांमध्ये माजी विद्यार्थी व शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले.
माजी विद्यार्थी राजेश गोपाळ नाईक, श्रीकृष्ण अच्छुत योगी, स्वप्नील अशोक देसाई, धनंजय नारायण परब, रिना वायंगणकर (धुरी-पाट) यांनी सहकार्य जाहीर केले. त्याचप्रमाणे शिक्षक मंगेश तेंडोलकर व संतोष भरडकर यांनीही आर्थिक मदत केली. मुख्याध्यापक श्री.माणिक पवार, तसेच उमेश धर्णे, शरद नाईक, संतोष सांगळे, उर्मिला गवस या शिक्षकांनीही आर्थिक सहकार्य करून उपक्रमास बळ दिले.
कार्यक्रमात प्रभू यांचे शिष्य कु. अनुष मांजरेकर यांनी गायनाचा उत्कृष्ट नमुना सादर केला. ऐश्वर्या चव्हाण हिने इशस्तवन व स्वागत गीत सादर करून रसिकांची मने जिंकली. पखवाज वादक जनार्दन टुंबरे यांनी चौतालात प्रश्न-तुकडे सादर करून उपस्थितांना भारावून टाकले, तर आसोली (वेंगुर्ले) येथून आलेल्या खडपकर यांचे शिष्य यांनी विलंबित त्रिताल मधून वादन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
हार्मोनियम व पखवाज वादनाचे प्रशिक्षण देणारे श्रीयुत योगेश प्रभू (विशारद व अलंकार अंतिम वर्ष) आणि श्रीयुत दत्तप्रसाद खडपकर( विशारद व अलंकार अंतिम वर्ष)यांचा या वेळी प्रशालेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळा समिती सदस्य श्री. संजय नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे फायदा करून घ्यावा यातून आपले नाव लौकिक करावे. ही संधी प्रशालेत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यानी श्री.सांगळे सर इतर शिक्षकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
श्री योगेश प्रभू यानी आपल्या भाषणातून संगीतातील गायन वादन एका घराचे दोन दरवाजेआहेत असे सांगितले. एकावेळी गायन व वादनाची शिकण्याची संधी प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिल्याचेही आपल्या भाषणातून सांगितले.याच्यातून मिळणाऱ्या आनंदाबद्दल माहिती दिली.
सदरील संगीत वर्ग विद्यालयामधील विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील संगीतप्रेमी साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे”दर गुरुवारी संध्याकाळी ३.४५ वाजता शास्त्रीय संगीत वर्ग घेतले जातील. परिसरातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सांगळे, प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री.माणिक पवार यांनी तर आभार प्रदर्शन सौ.सिद्धी शिरसाट यांनी केले.