मालवणमध्ये नोकरीच्या नैराश्यातून २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

मालवण : मनासारखे काम मिळत नसल्याच्या तीव्र नैराश्यातून मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ येथील २४ वर्षीय जगन्नाथ धोंडी सडवेलकर या तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या घराच्या परिसरात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे आणि पोलीस कर्मचारी अनुप हिंदळेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सखोल माहिती घेत पंचनामा केला. त्यानंतर, जगन्नाथचा मृतदेह मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

जगन्नाथच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे आनंदव्हाळ परिसरात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पेडणेकर करत आहेत. जगन्नाथने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!