कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील किडनी डायलेसीस केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोहळा आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी दहा किडनी डायलेसीस कार्यान्वित करण्यात आले आहेत.
आज लोकापर्ण सोहळा प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, कुडाळ शहर प्रमुख ओंकार तेली, गटनेता विलास कुडाळकर, राकेश कांदे, रेवती राणे, आबा धडाम,आना भोगले, संदेश नाईक, राजन भगत, डॉ भावना तेलंग डॉ संजय वाळके, संजय भोगटे, मंगेश चव्हाण, रुपेश बिडये आदी उपस्थित होते.
जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ बाबत माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील म्हणाले हे रुग्णालय १०० खाटांचे असुन डिसेबर २०२० पासून रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत झालेले आहे. या रुग्णालयामध्ये महिलांचे स्त्री रोग विषयक आजार यावरील उपचार, शस्त्रक्रिया, प्रसुतीविषयक सेवा, बालरुग्णचिकित्सा उपचार, नवजात बालक उपचार चिकित्सा (एसएनसीयु) या सेवा २४ तास देण्यात येतात, शासनाने या रुग्णालयासाठी १०० खाटांच्या आकृतीबंधानुसार एकुण ४२ एवढी नियमित पदे नव्याने मंजुर केलेली आहेत. त्यापैकी २३ पदे भरलेली असुन १९ पदे रिक्त आहेत. यापदांमध्ये वैदयकिय अधिक्षक, स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ, बालरोग तज्ञ, एमबीबीएस वैदयकिय अधिकारी व इतर तांत्रिक आणि शुश्रुषा संवर्गातील पदे रुग्णालयीन सेवेसाठी भरलेली आहेत. कंत्राटी सेवेतील एकुण कुशल कर्मचारी वर्गाची ५२ पदे मंजूर असुन बाहयस्य यंत्रणेव्दारा ५१ पदे भरलेली आहेत. त्याव्यतिरिक्त बाहयस्य यंत्रणेव्दारा ३ सफाईगार पदे भरलेली आहेत. रुग्णालयीन सेवेसाठी आवश्यक वैदयकिय उपकरणे व आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध आहेत. रक्तपेढी सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरु आहे. जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे शासनाकडुन सार्वजनिक-खाजगी तत्वावरील कार्यक्रम (पीपीपी) याअंतर्गत किडनी डायलेत्तीस केंद्र मंजुर केलेले आहे. सदर किडनी डायलेसीस केंद्र हे मे. एचएलएल लाईफ केअर लि. या कंपनीकडून पीपीपी तत्वावर चालविले जाणार आहे, तसा संबंधित कंपनीबरोबर आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांचेकडुन करार करण्यात आलेला आहे. पीपीपी तत्वावरील नवीन वरील डायलेसीसी केंद्राकरीता १० हिमोडायलेसीस यंत्र, आरओप्लांट, डायलायझर रिप्रोसेसिंग मशिन व इतर आवश्यक साधनसामुग्री कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. किडनी डायलेसीस केंद्रात येणा-या रुग्णांना हिमोडायलेसीस उपचार देण्यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ, यामध्ये २ किडनी डायलेसीस तंत्रज्ञ, १ अधिपरिचारिका व १ सहाय्यक कर्मचारी असा कर्मचारी वर्ग कार्यरत झालेला आहे. सदर डायलेसीस युनिट स्थापित्त केल्यानंतर रुग्णांची डावलेसीस उपचार चाचणी घेण्यात आली व सदरची चाचणी यशस्वी झाल्याची खात्री झाल्यानंतर आता सदरचे युनिट लोकार्पणासाठी सज्ज झालेले आहे या किडनी डायलेसीस युनिटमध्ये प्रतीदिन २ सत्रामध्ये ३ ते ४ तास याकालावधीचे २० रुग्णांचे किडनी डायलेसीस उपचार नियमितरित्या सुरु होत आहेत. यासेवेमुळे कुडाळ तसेच नजीकच्या तालुक्यातील किडनीच्या आजाराने आजारी असलेल्या रुग्णांना मोफत उपचार मिळण्याची सुविधा आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नामुळे जनतेसाठी उपलब्ध झालेले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली.